उद्देश
विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचे अचूक संकलन करून, नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांना लागू असणाऱ्या व्यक्तिअनुरुप स्वरूपातील सर्व योजनांची माहिती क्लिक सरशी उपलब्ध करणे हा ‘जनलाभ’ पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.
थोडक्यात
विविध कल्याणकारी शासकीय योजनांचे वर्गीकरण करून, त्यासाठी लागणाऱ्या नागरिकांच्या विविध माहिती स्त्रोतांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने केंद्र व राज्य तसेच जिल्हास्तरीय सरकारच्या विविध योजनांच्या शासन आदेशांचा (GR) अभ्यास करून हे पोर्टल बनवण्यात आले आहे. याचबरोबर विविध शासकीय विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांचा (वेबसाईट) सुद्धा यासाठी संदर्भ घेण्यात आला आहे.
नागरीक स्वत:च्या स्मार्टफोनवरून किंवा जवळच्या एमकेसीएल MS-CIT केंद्रात जाऊन ‘जनलाभ’ पोर्टलवर नोंदणी करू शकतात.नागरिकांच्या गरजेनुसार, भूमिकेनुसार त्यांना योजना व त्यांचे लाभ निवडण्याची सुविधा ‘जनलाभ’ पोर्टलवर आहे. पसंतीनुसार निवडलेल्या सर्व योजनांच्या लाभांसाठी नागरिकांची संभाव्य पात्रता पडताळून देण्यात येते. नागरिक ज्या ज्या योजनांना पात्र आहेत त्या त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा, कोणाला भेटावे ह्याची माहितीसुद्धा नागरिकांना ‘जनलाभ’ सेवेच्या माध्यमातून देण्यात येते.
‘जनलाभ’ पोर्टलची सेवा घेताना नागरिकांना करावी लागणारी प्रक्रिया
- आपण स्मार्टफोन वरून https://janlabh.mkcl.org या संकेतस्थळाला भेट देऊन सर्वप्रथम आपली नोंदणी करावी. ‘जनलाभ’ पोर्टलवर नोंदणीनंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर १२ अंकी लॉगीन आयडी पाठवला जातो जो की, भविष्यात जनलाभ पोर्टलची सेवा घेण्यासाठी आवश्यक असतो.
- आपल्याजवळ स्मार्टफोन नसल्यास किंवा आपण डिजिटल साक्षर नसल्यास जवळच्या MS-CIT केंद्राला भेट द्यावी व तेथील संगणक प्रशिक्षित व्यक्ती / प्रेरकाच्या मदतीने आपली नोंदणी करावी. 'जनलाभ’ पोर्टलवर आपली अचूक माहिती भरताना आणि योजनांसाठी संभाव्य पात्रता पडताळून पाहताना आपला बहुमूल्य वेळ वाचावा यासाठी आपण स्वत: च्या काही माहितीची जुळवाजुळव आधीच करून ठेवणे अपेक्षित आहे जसे की, आपला वैयक्तिक तपशील, कौटुंबिक माहिती, शेतीविषयक माहिती, पशुधनविषयक माहिती, आरोग्यविषयक तसेच शैक्षणिक माहिती इत्यादी तपशील आणि जमल्यास त्यासंदर्भातील आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी.
- नोंदणी नंतर जनलाभ पोर्टलमध्ये आपण आपली प्राथमिक माहिती भरावी. त्यानंतर आपण कोण आहात आणि आपल्या गरजा कोणत्या आहेत याची माहिती पोर्टलवर नोंदवावी. यानंतर आपण नोंदविलेल्या या माहितीच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध योजना आपल्या समोर स्क्रीनवर पाहण्यासाठी आणि पुढील सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला जनलाभ पोर्टल वापरण्यासाठीचे सदस्य शुल्क ₹ १००/- फक्त ऑनलाईन स्वरूपात भरावे लागेल. आपल्या जनलाभ सदस्यत्वाची वैधता ही सदस्यत्व शुल्क भरल्यापासून पुढील १ वर्षासाठी असेल.
- ज्या योजनांची पात्रता जाणून घेण्यास आपण इच्छुक आहात त्याची संगणकाच्या मदतीने पडताळणी करून घेण्यासाठी आपल्याला आवश्यक ती माहिती भरावी लागेल.
- अचूक माहिती भरल्यानंतर आणि काही ठिकाणी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यानंतर ‘जनलाभ’ पोर्टल आपण कोणत्या योजनांसाठी संभाव्य पात्र आहात याची माहिती देईल. या माहितीमध्ये संभाव्य पात्र योजनेचे नाव, त्यामध्ये मिळणारा लाभ, तो मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि लाभ घेण्यासाठी कोणाला भेटावे या माहितीचा समावेश असेल. आपण या माहितीचे पत्र डाऊनलोड करू शकतात. तसेच संभाव्य योजनांचे उपलब्धतेनुसार नमुना अर्ज, शासकीय जीआर डाऊनलोड करण्याची सुविधा सुद्धा दिली गेली आहे.
- जर आपण केंद्रावर जाणार असल्यास तेथील केंद्रावरील प्रेरक आपल्या वतीने जनलाभ पोर्टलवर माहिती भरेल. मात्र आपल्याला संबंधित प्रेरकाला तो आपल्याला देत असलेल्या सेवेसाठी जादाचे शुल्क द्यावे लागू शकते. (हे शुल्क प्रती सेवेकरिता जास्तीत जास्त ₹ १००/- पर्यंत असू शकते) येथे अचूक माहिती देण्याची जबाबदारी आपलीच राहील. नमुना अर्ज अथवा जीआर याची हार्ड कॉपी आवश्यक असल्यास आपल्याला त्यासाठी जादाचे शुल्क द्यावे लागेल. (हे शुल्क प्रती प्रिंट ₹ १/- ते ₹ ५/- च्या दरम्यान असू शकते)